महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री मा. ना. श्री. विनोद तावडे यांचे मनोगत

महाराष्ट्रात वाचनसंस्कृतीचा विकास करण्यासाठी - पर्यायाने मराठी साहित्याचा आणि भाषेचा विकास साधण्यासाठी – महाराष्ट्र शासन गांभीर्याने प्रयत्न करीत आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन (दि. 15 ऑक्टोबर) वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणे, अनेक शासकीय विभागांच्या विविध कार्यक्रमांमध्ये पुष्पगुच्छांऐवजी पुस्तकं भेट देणे आदी अनेक अभिनव उपक्रम कार्यान्वित झाले आहेत. पुस्तकांचं गाव हा प्रकल्प ही आमच्या प्रयत्नांची पुढची पायरी आहे. वाचनसंस्कृती संवर्धनाच्या माध्यमातून, सजग, संवेदनशील आणि समर्थ समाजाची पायाभरणी करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाचे लोकार्पण झाल्यानंतर कार्यपूर्तीचा आणि स्वप्नपूर्तीचा आनंद मी अनुभवतो आहे.
सर्वांना पुस्तकांच्या गावात येण्याचे सस्नेह निमंत्रण!

प्रस्तावना

काही वर्षांपूर्वी एक पर्यटक म्हणून मी सहकुटुंब इंग्लंडला गेलो होतो. त्या वेळी वेल्समध्ये असलेल्या ‘हे ऑन वे’ या नावाचं गाव पाहण्याची संधी मला मिळाली. ते पुस्तकांचं गाव होतं. पुस्तकांनी भरलेली पंचवीस मोठी दुकानं तिथे होती. पुस्तकं पाहण्यासाठी अक्षरशः लाखो पर्यटक जगभरातून आले होते. पुस्तकं आणि त्यात वावरणारे हजारो पुस्तकप्रेमी असं ते दृश्य होतं. तिथे फिरत असतानाच मी मनोमन ठरवून टाकलं की आपल्या महाराष्ट्रात असं पुस्तकांचं गाव उभं करायचं. भारतात परत आल्यावर मी भेटेल त्याला त्या ‘पुस्तकांच्या गावा’ विषयी सांगत होतो. तसं गाव महाराष्ट्रात साकारलं जावं हे माझं स्वप्न बोलून दाखवत होतो. सगळेचजण माझ्या स्वप्नाशी सहमत होते, पण हे स्वप्न पूर्ण कसं होणार हा मात्र प्रश्न होता. एकदा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये एका कार्यशाळेच्या निमित्ताने डॉ. अरुण टिकेकरांची भेट झाली. त्यांनी ‘हे ऑन वे’ पाहिलेलं होतं. तिथे उपलब्ध असलेली अनेक दुर्मिळ पुस्तकं पाहून ते थक्क झाले होते. त्या गावात फिरत असतानाच त्यांनी बदलापूरच्या श्याम जोशी यांना फोन केला होता. ‘आपण जणू स्वर्गात असल्याचा भास होतो आहे’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. पुस्तकांच्या गावाविषयी मी जसा टिकेकरांसारख्या ज्येष्ठ ग्रंथप्रेमींशी बोलत होतो; तसाच त्या काळातल्या शासनातल्या अधिका-यांशी आणि मंत्र्यांशीही बोलत होतो. पण आमच्या पक्षाची सत्ता नसल्यामुळे कल्पना मांडण्यापलीकडे माझ्या हातात फारसं काही नव्हतं. अर्थात ‘महाराष्ट्रात पुस्तकांचं गाव असावं’ हे स्वप्न मात्र माझा पिच्छा सोडत नव्हतं.

घोषणा

योगायोग असा, की पुढे मीच मराठी भाषा मंत्री झालो आणि स्वप्नपूर्तीची संधी चालून आली. मी (मंत्री झाल्यानंतरच्या) पहिल्याच ‘मराठी भाषा गौरव दिना’ला (दि. २७ फेब्रुवारी, २०१५) ‘पुस्तकांच्या गावा’ ची घोषणा केली. त्या घोषणेलाही समाजाच्या सर्व स्तरांतून प्रतिसाद आला. पण शासनातली कोणतीही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासनाची साथ अत्यंत आवश्यक असते. ‘पुस्तकांचं गावं’ साकारण्यासाठी मला प्रशासनाची साथ जरा वेगळ्या प्रकारे अपेक्षित होती. ‘पुस्तकांचं गावं’ म्हणजे शासनाच्या अनेक योजनांपैकी एक अशी योजना नव्हती, जरा वेगळा प्रकार होतोय म्हणून मला पुस्तकांची आणि वाचनाची विशेष आवड असलेला अधिकारी हवा होता. ही गरज लक्षात घेऊन मी भूषण गगराणी यांची निवड केली. आय. ए. एस. च्या परीक्षेचे सर्व पेपर्स मुद्दाम मराठी भाषेत लिहून आय. ए. एस. झालेले हे अधिकारी आहेत. त्यांचं वाचन खूप आहे. त्यामुळेच मला असं वाटलं, की अशी व्यक्ती मराठी भाषा विभागाची प्रधान सचिव असेल, तर आपल्या कल्पनेमधलं ‘पुस्तकांचं गाव’ त्याच्या आशयासकट प्रत्यक्षात येईल. माझा अंदाज खरा ठरला. श्री. गगराणी आणि त्यांच्या सहकारी अधिका-यांनी ‘पुस्तकांचं गावं’ प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

गावाचा शोध

... महाबळेश्वर व पाचगणी या थंड हवेच्या पर्यटनस्थळी येणाऱ्या लोकांची प्रचंड संख्या पाहता आणि या परिसराशी जोडलेल्या दळणवळणाच्या सुविधा पाहता या परिसरातील जवळपासचे गाव शोधावे, असे ठरले...
‘पुस्तकांचं गावं’ उभं करायच ठरल्यावर ते कुठे करावं यावर चर्चा सुरु झाली. या चर्चेतून एक व्यावहारिक मुद्दा पुढे आला. अमुक एका ठिकाणी पुस्तकांचं गाव केलं म्हणून लोक आवर्जून ते पाहायला जातील याची खात्री देता येत नाही. मग ज्या ठिकाणी लोक पर्यटक म्हणून आपणहून जात असतात तिथे हे गाव वसवावं असं ठरलं. त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांचा अभ्यास सुरु झाला. महाबळेश्वर व पाचगणी किंवा गणपतीपुळे या ठिकाणी पर्यटकांचं येणं मोठ्या प्रमाणावर असतं असं लक्षात आलं. महाबळेश्वर व पाचगणी या थंड हवेच्या पर्यटनस्थळी येणाऱ्या लोकांची प्रचंड संख्या पाहता आणि या परिसराशी जोडलेल्या दळणवळणाच्या सुविधा पाहता या परिसरातील जवळपासचे गाव शोधावे, असे ठरले. त्यामुळे महाबळेश्वरच्या आसपासच्या गावांचा शोध सुरु झाला.

भिलारची निवड

भिलार हे गाव अत्यंत रमणीय आणि निसर्गसंपन्न आहे. स्ट्रॉबेरीसाठी ते प्रसिद्ध आहे. त्यामुळे महाबळेश्वरला आलेल्या पर्यटकांना तिथे येण्याची सवय आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या गावात बेड अँड ब्रेकफास्ट (राहण्याची आणि नाश्त्याची सोय) ही योजना लागू केल्यामुळे गावाला स्वत:चे उत्पन्न आहे. पण गाव नक्की करण्यापूर्वी गावाची संपूर्ण माहिती गोळा करणं आवश्यक होतं. ती करताना लक्षात आलं की 200५ साली या गावात भूस्खलन झालं होतं. ही बाब दखल घेण्याजोगी होती. नजीकच्या भविष्यात या गावावर अशी काही आपत्ती येऊ शकते का याची खातरजमा करणं आवश्यक होतं. त्यासाठी तिथल्या मातीची तपासणी करण्यासाठी आय. आय. टी. (मुंबई) ची टीम तिथे गेली. त्यांचा अभ्यास पूर्ण झाल्यावर या गावाला कोणताही धोका नसल्याचा अहवाल आणि प्रमाणपत्र हाती येईपर्यंत आठ-दहा महिन्यांचा काळ गेला, पण त्यानंतर मात्र संपूर्ण प्रक्रियाच गतिमान झाली.

"आजी, तुम्ही घरात एकट्याच राहता. पुस्तकं वाचायला येणारा एखादा अनोळखी इसम तुम्हाला त्राल देईल अशी भीती वाटत नाही का?"
"जो माणूस पुस्तकं वाचायला येतो तो वाईट असूच शकत नाही..."
सगळ्यात आधी गावातल्या लोकांशी संवाद साधणं आवश्यक होतं. कोणत्याही अनोळखी माणसाला आपल्या घरात घेण्याची मराठी मानसिकता नाही. त्यामुळे घरामध्ये पुस्तकं ठेवायची आणि ती वाचण्यासाठी पर्यटक-वाचकांना घरात बसू द्यायचं, ही कल्पना भिलारचे लोक कसे स्वीकारतील हा आमच्यासाठी उत्सुकतेचा विषय होता. आश्चर्य म्हणजे संपूर्ण गावाने या कल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक घरातली लहानथोर मंडळी या कल्पनेने आनंदली होती. एका घरामध्ये एक खूप वयस्कर आजीबाई राहत होत्या. मी त्यांना म्हटलं, “आजी, तुम्ही घरात एकट्याच राहता. पुस्तकं वाचायला येणारा एखादा अनोळखी इसम तुम्हाला त्राल देईल अशी भीती वाटत नाही का?” त्यावर त्या आजीबाईंनी दिलेलं उत्तर माझ्या नेहमीच लक्षात राहील. त्या म्हणाल्या, “जो माणूस पुस्तकं वाचायला येतो तो वाईट असूच शकत नाही. मला भीती तर अजिबात वाटत नाही. उलट, दररोज जेवढे जास्त लोक पुस्तकं वाचायला येतील तेवढं चांगलं.” भिलारमधील ग्रामपंचायत व गावकरी यांचा उत्साह आणि आग्रही प्रतिसाद लक्षात घेऊन भिलारची निवड नक्की झाली.

पुस्तकांची निवड

या गावातल्या पंचवीस ठिकाणांची निवड आम्ही केली आहे. यात घरे, निवासाची सोय असलेली घरे, लॉजेस, शाळा व मंदिरे यांचा समावेश आहे. प्रत्येक ठिकाणी कोणत्या तरी एका साहित्यप्रकाराचं दालन केलं आहे. म्हणजे एखाद्या घरात फक्त बालसाहित्य आहे, तर एखाद्या घरात चरित्रं-आत्मचरित्रं! त्या त्या साहित्यप्रकाराप्रमाणे त्या घराची बाह्य रंगरंगोटी आणि सजावट केलेली आहे. स्वत्व (ठाणे) गटाच्या ७५ कलाकारांनी कोणतेही व्यावसायिक शुल्क न घेता प्रकल्पातील ठिकाणांना सुंदर दृश्यात्मकता प्राप्त करुन दिली आहे. कोणीही वाचक तिथे गेला की हवं ते पुस्तक घेऊन वाचू शकतो आणि नंतर पुस्तक परत करुन तृप्त मनाने परतू शकतो. वाचायला बसण्यासाठी काही खास जागा तयार केल्या आहेत. समोर पाचगणीचा टेबललॅंड दिसतो, निर्मळ रानवारा अंगाला सुखावत असतो आणि हातात आवडीचं पुस्तक असतं, असा सुरेख अनुभव आता वाचक घेऊ शकतात.

२५ ठिकाणे - २५ साहित्यप्रकार

या गावात ठेवण्याच्या पुस्तकांची निवड कशी करावी हा आमच्यापुढे प्रश्न होता. कारण ‘हे ऑन वे’ प्रमाणे इथे पुस्तकांची विक्री करायची नसून ती वाचकांना वाचनासाठी मोफत उपलब्ध करुन द्यायची आहेत हे नक्की झालं होतं. याचा अर्थ शासनातर्फे पुस्तंक खरेदी करण्याला पर्याय नव्हता. याबाबत विचार करुन आम्ही वेगळा मार्ग शोधला. मान्यवर लेखक, ग्रंथपाल, मराठीचे प्राध्यापक यांची एक समिती तयार केली. ही समिती ज्या पुस्तकांची शिफारस करेल, ती पुस्तकं थेट प्रकाशकांकडून खरेदी करायची असा निर्णय झाला.

... माझ्या मते तो दिवस लांब नाही, जेव्हा पुस्तकांच्या गावासाठी लोक तिथे येतील आणि ‘आलोच आहोत तर महाबळेश्वरही पाहू’ असा विचार करतील...
मला या निमित्ताने प्रकाशकांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी चाळीस-पन्नास टक्क्यांपर्यंत सवलतीत पुस्तकं उपलब्ध करुन दिली. अर्थात पुस्तक खरेदीची ही फक्त सुरुवात आहे. पुढच्या दोन वर्षात तिथे एक ते दीड लाख पुस्तकं असावीत अशी कल्पना आहे. मराठीतली सर्वच्या सर्व दर्जेदार आणि वाचनीय पुस्तकं तिथे असावीत असा आमचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमी पुरस्कारांनी सन्मानित सर्व भारतीय लेखकांची पुस्तकं तिथे वाचकांना उपलब्ध होतील. इतकंच नाही, तर जगात सर्वोत्तम मानली गेलेली इंग्रजी पुस्तकंही असतील. वाचनातून माणूस समृद्ध होतो असा सकस अनुभव देणारं हे गाव असेल. सध्या पाचगणी-महाबळेश्वरला पर्यटनाला येणारे पर्यटक या गावाला भेट देत आहेत. माझ्या मते तो दिवस लांब नाही, जेव्हा पुस्तकांच्या गावासाठी लोक तिथे येतील आणि ‘आलोच आहोत तर महाबळेश्वरही पाहू’ असा विचार करतील.

आगामी वाटचाल

भिलारच्या गावकऱ्यांविषयी आणखी एक गोष्ट मला आवर्जून सांगितली पाहिजे. ही मंडळी केवळ कल्पनेचं स्वागत करुन थांबली नाहीत, तर त्यांनी गावठाणाच्या मालकीची सुमारे ३ एकर जागा या उपक्रमासाठी दिली आहे. या जागेमध्ये लवकरच आम्ही ॲम्फी थिएटर बांधणार आहोत. हे थिएटर म्हणजे तर वाचनसंस्कृतीचा विलोभनीय आविष्कार असेल. येथे व्यंकटेश माडगूळकर, जी.ए. कुलकर्णी किंवा पु. ल. देशपांडे यांसारख्या साहित्यिकांचे महोत्सव होतील. ज्या लेखकाचा महोत्सव असेल, त्याची सर्व पुस्तकं तिथे उपलब्ध असतील. त्याच्या लेखनावर तिथे चर्चा होतील. वाचक स्वतःचे अनुभव सांगतील. शिवाय एखाद्या पुस्तकावर चित्रपट निघाला असेल, तर त्या पुस्तकाचं प्रकट वाचन आणि त्या चित्रपटाचं सादरीकरण एकाच दिवशी होईल. किंवा एखाद्या पुस्तकावर नाटक आलं असेल तर त्या नाटकातला प्रवेश सादर होईल. याच्या जोडीने या ॲम्फी थिएटरमध्ये काव्यवाचनाचे कार्यक्रम होतील. नव्या पुस्तकांवर चर्चा होतील. वाचकांच्या भेटीसाठी मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती असेल. शिवाय हे कार्यक्रम कधी आणि कशा प्रकारे सादर होतील याचं वर्षाचं कॅलेंडर असेल. ते कॅलेंडर वर्षाच्या सुरुवातीलाच जाहीर होईल. म्हणजे आपल्या आवडत्या लेखकांच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी वाचक आवर्जून पुस्तकांच्या गावी पोहोचतील. पुस्तकांचा हा गाव गजबजून जाईल.

भिलारच्या गावकऱ्यांनी गावठाणाच्या मालकीची सुमारे ३ एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेमध्ये लवकरच आम्ही ॲम्फी थिएटर बांधणार आहोत. हे थिएटर म्हणजे तर वाचनसंस्कृतीचा विलोभनीय आविष्कार असेल.
या गावाचं उद्घाटन झाल्यानंतर ज्या उत्स्फूर्तपणे महाराष्ट्राने त्याचं स्वागत केलं, ते पाहून मी आणि माझे सर्व सहकारी विशेष आनंदी झालो आहोत. पहिल्या दोन-तीन दिवसांतच शरद पवारसाहेबांनी या गावाला भेट दिली. त्यांनी प्रत्येक घरात जाऊन पुस्तकं चाळली, गावकऱ्यांशी चर्चा केली. आपल्याला ही कल्पना आणि त्याचं सादरीकरण आवडल्याचं त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलं. इतकंच नाही, तर या गावाला दहा लाख रुपयांची पुस्तकं भेट द्या, असं त्यांनी रयत शिक्षण संस्थेला सांगितल. द. मा. मिरासदारांसारख्या साहित्यिकाने स्वतःच्या संग्रहातली पुस्तकं या गावासाठी पाठवून दिली, तर बदलापूरचे प्रसिद्ध पुस्तकप्रेमी श्याम जोशी यांनी या गावाला जाऊन प्रत्यक्ष सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. पुढच्या वर्षभरात ते भिलारमधील घरांमध्ये राहणा-या लोकांना ग्रंथालय व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देणार आहेत. कारण पुस्तकं कशी हाताळायची, वाचकाला हवं असलेलं पुस्तक पटकन कसं काढून द्यायचं किंवा पुस्तकांच्या नोंदी कशा ठेवायच्या, या गोष्टी शिकवण्याची गरज आहे. ते काम श्याम जोशी करणार आहेत.

भिलारनंतरची पुस्तकांची गावं कोणती असतील याविषयी आता चर्चा सुरु झाली अहे. तशी ती होणं स्वाभिविकही आहे. केशवसुतांचं मालगुंड आणि ताडोबा जंगलाजवळचं एक गाव प्रस्तावित आहे. पण काही साहित्यिकांच्या मते महाराष्ट्रात पुस्तकांचं गाव एकच असावं, म्हणजे त्याचं वेगळेपण टिकून राहील. जर हा उपक्रम पुढे न्यायचा असेल तर एखादं फक्त कवितेचं गाव करावं, ज्याची रचना वेगळ्या प्रकारे करता येईल. अर्थात हे सगळं फक्त चर्चेच्या पातळीवर आहे. महाराष्ट्रातल्या सर्व लेखक-वाचक-प्रकाशक आणि साहित्यप्रेमींच्या सूचनांमधून अनेक नावीन्यपूर्ण कल्पना पुढे येतील याविषयी मला पूर्ण खात्री आहे.

या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील वाचकांना आणि पर्यटकांना मी भिलारला येण्याचं आग्रही निमंत्रण देतो आहे. या गावाने मला स्वतःला स्वप्नपूर्तीचा आनंद दिला आहे. ‘तुमच्या आयुष्यातलं एकच महत्त्वाचं काम सांगा’, असं मला भविष्यात कोणी विचारलं तर क्षणाचाही विलंब न लावता मी उत्तर देईन, ‘पुस्तकांचं गाव’!