प्रकल्प साकारताना..

फेब्रुवारी 2017 मध्ये प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर गावाची निवड, प्रकल्पाची नेमकी संकल्पना इत्यादींबाबत विचार झाले, चर्चा झाल्या आणि निर्णय घेण्यात आले. पुढे दिलेल्या टप्प्यांमधून प्रवास करत हा प्रकल्प आकारास येऊन दिनांक ४ मे, २०१७ रोजी प्रकल्पाचे लोकार्पण झाले.
28 एप्रिल, 2017 चे सादरीकरण

घोषणा

सर्वप्रथम दिनांक २७ फेब्रुवारी, 201५ रोजी मराठी भाषा गौरव दिनाच्या सार्वजनिक कार्यक्रमात, महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व सांस्कृतिक मंत्री मा.ना. विनोद तावडे यांनी महाराष्ट्रात “पुस्तकांचं गाव” निर्माण करु अशी घोषणा केली.

दिनांक २७ फेब्रुवारी, 201७ रोजी मराठी भाषा गौरव दिनाच्या गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथील भव्य कार्यक्रमात, महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व सांस्कृतिक मंत्री मा.ना. विनोद तावडे यांनी दिनांक १ मे, २०१७ रोजी (प्रत्यक्षात लोकार्पण दि. ४ मे, २०१७) भिलार, ता. महाबळेश्वर येथे पुस्तकांच्या गावाच्या लोकार्पण सोहळ्यास येण्याचे निमंत्रणच उपस्थितांना दिले. (फोटो)

गावाची व घरांची निवड

या प्रकल्पासाठी गाव निवडताना खालील बाबींचा प्रामुख्याने विचार करण्यात आला:-

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध व जास्तीत जास्त पर्यटकांची वर्दळ असणारे त्या ठिकाणाजवळचे गाव असावे.
  • पर्यटकांसाठी राहण्याची/जेवणाची किमान सोय असणारे गाव असावे.
  • ज्या गावातील किमान २० घरांचे मालक या प्रकल्पात स्वेच्छेने सहभागी होण्यास इच्छुक असतील असे गाव असावे.
  • जी ग्रामपंचायत या प्रकल्पासाठी स्वेच्छेने जागा देण्यास तयार असेल असे गाव असावे.
  • ज्या गांवातील घरे आपल्या घरातील किमान १ खोली प्रकल्पासाठी देण्यात विनाअट / विनामोबदल्यात तयार असलेले गाव असावे.
  • ज्या गावातील घरे / घरमालक आपल्या घरात ठेवलेल्या पुस्तकांची जबाबदारी घेण्यास तयार आहेत असे गाव असावे.
  • जी ग्रामपंचायत ग्रामसभेत ठराव करून प्रकल्पास स्वातंत्र जागा देण्यास तयार असेल असे गाव असावे.
  • तंटाबंदी, दारुबंदी, स्वच्छता आणि पर्यटनविषयक विविध शासकीय योजनांमध्ये अग्रेसर असलेले गाव असावे.
  • घरमालक व त्यांच्या कुटुंबीयांची पुस्तके व फर्निचर यांची काळजी घेण्याची तयारी असावी.
स्वातंत्र्य चळवळीतील गावाचा सहभाग, समृद्ध ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी, स्वच्छतेचा आग्रह, पर्यटक निवासाची व्यवस्था, शासकीय योजनांमध्ये सहभागी होण्यासाठीचा ग्रामपंचायतीचा पुढाकार, या प्रकल्पाबाबत गावकऱ्यांची उत्साही भूमिका या सर्व घटकांचा विचार करून, या प्रकल्पासाठी महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावाची निवड करण्यात आली.

सजावट व रंगकाम

प्रकल्पाच्या उद्दिष्टांना अनुरुप दृश्यात्मकता प्राप्त करण्यासाठी ठाणे येथील स्वत्व या स्वयंसेवी समूहाच्या एकूण ७५ स्वयंसेवकांच्या गटाने दि. १४, १५ व १६ एप्रिल, २०१७ रोजी सुमारे १०००० चौ. मी. एवढ्या मोठ्या प्रमाणात अथकपणे भित्तिचित्रे रंगवून सजावट केली. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, सातारा जिल्हा, इंदूर अशा विविध ठिकाणांहून चित्रकार या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यांमध्ये कला महाविद्यालयांतील आजी-माजी प्राध्यापक, आजी-माजी विद्यार्थी आणि हौशी कलाकार सहभागी होते.

ह्या सर्जनशील कामात, गावातील आबालवृद्धांचा सक्रिय सहभाग, कलाकार व ग्रामस्थ यांच्यामध्ये मैत्री आणि कलाकारांना घराघरांमधून चहा, न्याहारी, भोजन व निवासाची व्यवस्था असे विशेष प्रसंग या काळात भिलारमध्ये घडले.

सुप्रसिद्ध एशियन पेन्टस् या समूहाने या कामासाठी सवलतीच्या दरामध्ये रंग उपलब्ध करून दिले.

पुस्तकांची निवड

नामवंत लेखक, प्राध्यापक, ग्रंथपाल इत्यांदीचा समावेश असलेल्या पुस्तक निवड समितीने पुस्तकांची निवड करण्यासाठी वेळोवळी बैठका घेतल्या. बैठकांमध्ये उपलब्ध प्रकाशन सूच्यांच्या आधारे पुस्तके निवडण्यात आली. प्रत्यक्ष पुस्तके पाहिल्यानंतर अधिक नेमक्या आणि व्यापक पद्धतीने पुस्तक निवड होऊ शकते, हे लक्षात घेऊन थेट निवडक प्रकाशकांकडे जाऊन पुस्तकांची निवड करण्यात आली.

पुस्तकांचे वर्गीकरण

पुस्तक निवड समितीने निवडलेली पुस्तके भिलार येथे पोहोचल्यानंतर साहित्यप्रकारनिहाय सर्व पुस्तकांचे वर्गीकरण करण्यात आले. त्याच्या स्वतंत्र हस्तलिखित व संगणकीकृत सूच्या तयार करण्यात आल्या. या कामात शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबतच शिक्षक, ग्रामस्थ, गावातील तरुण-तरुणी यांनी सार्थ सहभाग नोंदवला.

अन्य सामग्री निवड व पुरवठा

प्रकल्पात सहभागी झालेल्या घरे किंवा सार्वजनिक ठिकाणी शासनाकडून पुस्तके ठेवण्यासाठी कपाटे, पुस्तकाचे फिरते स्टँड, टेबल, खुर्च्या, टिपॉय, बोधचिन्ह असलेली छत्री, बीन बॅग, नोंदवही, अभिप्राय वही, घरांवरील पाटी, घरांबाहेरील दिशादर्शक पाटी अशा विविध पूरक साहित्याचा पुरवठा करण्यात आला

घरांचे ग्रंथालयांत रुपांतर

पुस्तकांचे वर्गीकरण झाल्यानंतर व विविध साहित्याचा पुरवठा झाल्यानंतर प्रकल्पात सहभागी घरे व सार्वजनिक ठिकाणे येथे साहित्यप्रकारनिहाय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी अत्यंत कल्पकतेने आणि अभिनव पद्धतीने पुस्तकांची मांडणी करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी सुमारे ३५० ते ७०० अशा संख्येने पुस्तके ठेवण्यात आली. प्रथम टप्प्यात एकूण १५,००० पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आली. या प्रकल्पात २५ ठिकाणचे ग्रंथालयात रुपांतर करण्यात आले. अशा प्रकारे संपूर्ण गावाचेच एका मोठ्या सार्वजनिक ग्रंथालयात रुपांतर झाले आहे.

साहित्यिक प्रदर्शनी व भाषिक खेळ

काही सार्वजनिक ठिकाणी मराठी साहित्य विश्वातील सुमारे ५० सुप्रसिद्ध साहित्यिकांची माहिती देणारी फलकांच्या साहाय्याने साहित्यिक प्रदर्शनी मांडण्यात आली.

प्रसारमाध्यमांचा प्रतिसाद व सहकार्य

प्रकल्पाच्या उद्घाटनापूर्वीच विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि नियतकालिके यांनी ही अभिनव कल्पना विविध पद्धतीने लाखो लोकांपर्यंत पोहोचवली. समाजप्रसारमाध्यमांवरही असंख्य लोकांनी या प्रकल्पाचा उत्स्फूर्तपणे प्रसार केला. अधिक माहिती

लोकार्पण

दिनांक ४ मे, २०१७ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देशातील या पहिल्या पुस्तकांच्या गावाचे लोकार्पण करण्यात आले.